BCCI नं केला दिग्गज खेळाडूंचा अपमान, युवराज सिंग कडाडला !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग याने जून 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. निवृत्तीचा निर्णय घेताना युवराज अत्यंत भावुक झाल्याचे दिसून आले. निवृत्तीचा निर्णय घेणे हे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते, पण मी माझ्या कुटुंबीयांशी चर्चा करून तसेच इतर वरिष्ठ आजी-माजी क्रिकेट सहकारी यांच्याशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. आता तब्बल वर्षभरानंतर युवराजने बीसीसीआय वर टीका केली आहे.

एखाद्याला निरोप देणे कशा पद्धतीचे असावे याचा निर्णय खेळाडू करत नाही, बीसीसीआय करते. मलादेखील निरोपाचा सामना खेळवणे हे त्यांच्या हातात होते. पण माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात मला फार वाईट वागणूक दिली. या यादीत मी एकटाच नाही. विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, जहीर खान यांच्याबाबतीतही फार काही वेगळे घडले नाही. या सार्‍या दिग्गज खेळाडूंना बीसीसीआयने वाईट प्रकारे वागणूक देऊन त्यांचा अपमानच केला. पण भारतीय क्रिकेटमध्ये हे सवयीचे झाले आहे. त्यामुळे माझ्या बाबतीत जेव्हा हे घडले तेव्हा मला फार आश्चर्य वाटले नाही, असे युवराज म्हणाला.

जे खेळाडू भारतासाठी दीर्घ काळ खेळले आहेत; ज्यांनी भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत अशा खेळाडूंना भविष्यात तरी चांगली वागणूक मिळाली पाहिजे. गौतम गंभीरसारख्या दोन विश्वचषक जिंकवून देणार्‍या खेळाडूला तसा आदर दिला जायला हवा होता. सुनील गावसकर यांच्यानंतर कसोटीत सेहवाग हा सर्वात मोठा मॅचविनर होता. जहीर खानने 350 गडी बाद केले होते. लक्ष्मणही उत्तम खेळाडू होता. अशा अनेक खेळाडूंना बीसीसीआयने वाईट वागणूक दिली. पण भविष्यात निवृत्त होणार्‍या चांगल्या खेळाडूंना थोडा आदरपूर्वक निरोप द्यायला हवा, असा सल्ला युवराजने दिला.