महाराष्ट्र ‘कमळमुक्त’ केल्याशिवाय गप्प बसणार नाही : खा. राजू शेट्टी

शिराळा : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून राजकीय पक्षांमध्ये टीका-टिपण्णी तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजपला खेड्यापाड्यात नेण्यासाठी हातभार लावला ही माझी मोठी चूक होती. ज्यांनी आमच्या जीवावर कमळ फुलवले त्यावर मी जालीम तणनाशक शोधले आहे. आत्ता महाराष्ट्र कमळ मुक्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. काँग्रेस कमिटीच्या एका बैठकीत ते बोलत होते.

भाजपवर टीका करताना शेट्टी म्हणाले की, ‘सत्तेचा वापर कसा करावा हे काँग्रेसवाल्यांना कळले नाही, पण त्यांना कळले. भाजपला खेड्यापाड्यात नेण्यासाठी हातभार लावला ही माझी मोठी चूक होती. ज्यांनी आमच्या जीवावर कमळ फुलवले त्यावर मी जालीम तणनाशक शोधले आहे. आत्ता महाराष्ट्र कमळमुक्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही.’

सांगलीचा तिढा अखेर सुटला –
गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी आणि काँग्रेसमध्ये सांगलीच्या जागेवरुन धुसफूस सुरु होती. खासदार राजू शेट्टी हे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सांगली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा केली होती. काँग्रेसने ही जागा स्वाभिमानीला सोडल्याने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे कुटुंब, माजी खासदार प्रतिक पाटील हे काँग्रेसवर नाराज झाले. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यावेळी वसंतदादांचे दुसरे नातू विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार केला. पण विशाल पाटील यांचं बंड थोपवण्यात काँग्रेस आणि स्वाभिमानीला यश आलं आहे. त्यामुळे सांगलीतून विशाल पाटील हे राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहेत.