सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्नशील रहावे : प्रा. शिंदे

महाराष्ट्रदिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक सलोखा हे आपल्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे, ते सर्वांनी मिळून कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन राज्‍याचे जलसंधारण व राजशिष्‍टाचार, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याण मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र दिनाच्या ५९ व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राऊंडवर झाला. त्यानंतर केलेल्या भाषणात ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर शानदार संचलन झाले. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी संचलनाची पाहणी केली.

पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, आपला जिल्हा हा संतांचा वारसा लाभलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. हा वारसा आणि परंपरा आपण सर्वांनी जपली पाहिजे, असे ते म्हणाले.

यावेळी परेड कमांडर परिविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने शानदान संचलन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गीतांजली भावे यांनी केले. कार्यक्रमास ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.