बॉण्ड…जेम्स बॉण्ड…हो तो पुन्हा आलाय !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   संपूर्ण जगभरात 007 चित्रपटांनी भुरळ घातली आहे. स्टाईल, वेग, अ‌ॅक्शन, गाड्या, वस्तू या गोष्टींमुळे लोकप्रिय झालेल्या ‘जेम्स बॉण्ड’चा २५ वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘जेम्स बॉण्ड : नो टाइम टु डाय’ असं आहे. चित्रपटाच्या नव्या ट्रेलरने सध्या जगभरातील समाज माध्यमात अक्षरशः धुमाकूळ घातलेला दिसतोय.

गुरुवारी दुपारी हा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये जबरदस्त अ‌ॅक्शन सीन्स आणि चकित करणारे स्टंट पाहावयास मिळत आहेत. चित्रपटात बॉण्डच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले जातील अशी हिंट ट्रेलर पाहिल्यावर आपल्याला दिसून येते. खरे तर हा दुसरा ट्रेलर असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. ‘नो टाइम टु डाय’चा पहिला ट्रेलर मराठी भाषेसह इतर १० भाषांमध्ये सुद्धा प्रदर्शित झालेला. मात्र, दुसरा ट्रेलर केवळ इंग्रजीत प्रदर्शित झाला आहे. अभिनेता डॅनियल क्रेगचा बॉण्ड सीरिजमधील ‘नो टाईम टु डाय’ हा शेवटचा चित्रपट आहे. जेम्स बॉण्डच्या इतिहासातील हा सर्वात मोठा चित्रपट असल्याचं निर्मात्याने सांगितलं आहे.

दरम्यान, जेम्स बॉण्डच्या भूमिकेतील डॅनिअल क्रेगचा प्रवास २००६ पासून ‘कॅसिनो रॉयल’ चित्रपटापासून सुरु झाला होता. नंतर २००८ मध्ये ‘क्वांटम ऑफ सोल्स,’ २०१२ ‘स्कालफॉल,’ २०१५ मध्ये ‘स्पेक्टर’ आणि आता ‘नो टाईम टु डाय’ हा डॅनिअल क्रेगचा शेवटचा बॉण्ड चित्रपट ठरणार आहे.