दहावीच्या परिक्षेस उत्साही वातावरणात सुरुवात

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस आज मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात सुरुवात झाली. पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, थेऊर, उरुळी कांचन येथील परिक्षा केंद्रावर अत्यंत शांततेत मराठी भाषेचा पहिला पेपर पार पडला.

थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदिर येथे यावर्षी पहिल्यांदाच परिक्षा केंद्र असल्याने येथे उत्तम तयारी करण्यात आली होती. आज सकाळी दहा वाजता परिक्षार्थी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मनात असलेले दडपण दूर करण्यासाठी सर्वांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. यावेळी गावचे नवनिर्वाचित उपसरपंच नितीन कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे, गोविंद तारु तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व केंद्र प्रमुख शोभा कोतवाल, उपकेंद्रप्रमुख बाळासाहेब नेवाळे तसेच परिक्षक म्हणून मधुकर खरात तसेच परिक्षा समन्वयक जीवन शिंदे व शांताराम काटकर यानी विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

यावर्षी येथे म्हातोबा माध्यमिक विद्यालय आळंदी, म्हातोबा ग्रामीण सर्वांगीण विद्यालय कुंजीरवाडी, यशवंतराव चव्हाण मेमोरियल इंग्लीश मेडियम स्कूल थेऊर सह चिंतामणी विद्या मंदिर येथील एकुण 298 परिक्षार्थी विद्यार्थी आहेत. परिक्षा शांततेत पार पाडण्यासाठी लोणी काळभोर पोलिस स्टशनचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे त्यांचे सहकारी पोलिस नाईक गणेश कर्चे, नितीन सुद्रीक यांनी चोख व्यवस्था ठेवली होती.