Coronavirus : चिंताजनक ! राज्यात 24 तासात ‘कोरोना’चे 1230 नवे रुग्ण तर 36 जणांचा मृत्यू, बधितांचा आकडा 23000 :पार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. लॉकडाऊन असताना देखील राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात राज्यात 1230 नवीन रुग्ण सापडले असून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23401 वर पोहचली आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मृतांचा आकडा देखील वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 36 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 868 झाली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण मुंबईत सापडले आहेत. मुंबईतील कोरोनाबाधितांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात 791 नवे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 14 हजार 355 एवढी झाली आहे. आतापर्यंत 3110 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाची लागण होऊन 528 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.