बारामतीमध्ये 14 दिवसांचा ’जनता कर्फ्यू !

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील बारामती शहर तालुक्यामध्ये मागील तीन दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांनी त्रिशतक पार केलंय. सलग तीन दिवस कोरोना रुग्णांचा आलेख चढता राहिल्यामुळे येथील प्रशासन हादरले आहे. अखेर प्रशासनाने कडक निर्बंध लागू करीत 14 दिवसांचा ‘जनता कर्फ्यु’ जाहीर केलाय. यात मेडिकल, दूध वगळता सर्व सेवा, व्यवसाय बंद राहणार असून बारामती शहराच्या सीमा चारही बाजूने ’सील’ करणार आहेत.

याबाबत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, मुख्यधिकारी किरणराज यादव यांनी माहिती दिलीय. त्यानुसार आता बारामती तालुका आणि शहर दि. 7 सप्टेंबर ते दि. 21 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यु राहणार आहे. बारामती शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहर कडक लॉकडाऊनमध्ये असणार आहे. याबाबत आज नगराध्यक्ष पोर्णिमा तावरे यांनी पत्रकारांच्या बैठकीत सांगितले की, बारामती शहरातील मागील चार दिवसातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 40 टक्के इतकी आहे.त्यामुळे वैद्यकीय सेवा ढासळू नये, यासाठी 14 दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केलाय.

पुढील 14 दिवस कोणालाही अत्यावश्यक सेवा वगळता घरातून बाहेर पडता येणार नाही. तसेच बारामती शहरातून बाहेर किंवा बाहेरील कोणालाही शहरात येता येणार नाही. बारामती तालुक्यातील कोरोना संसर्गाने बळी जाणार्‍यांची संख्या अधिक आहे. शहरातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. ‘जनता कर्फ्यु’साठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे, असेही तावरे म्हणाल्या. बारामती शहरातील खासगी डॉक्टरांनी कोविडच्या कामात हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असा देखील इशारा देखील त्यांनी दिलाय. कोरोनाचे रुग्ण असणार्‍या भागात ‘जनता कर्फ्यू’ राहणार आहे. तर बारामती तालुक्याबाहेरील कोणालाही शहरात येता येणार नाही. प्रत्येक गावातील लोकांनी अत्यावश्यक सेवा वगळता आपल्या गावाची सीमा बंद करायची आहे.

बारामती शहरात कोणत्याही प्रकारचे व्यवसाय, हातगाडी, अन्य विक्रेते सुरू राहणार नाहीत. यामुळे देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. बारामती तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या संदर्भात माहितीसाठी डॉ. मनोज खोमणे तर शहरातील नागरिकांनी डॉ. सदानंद काळे आणि डॉ. पंकज गांधी यांच्याशी व्हॉटस्अ‍ॅपवर संपर्क साधावा. तसेच आपल्या जवळील खासगी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,असे देखील आवाहन पोर्णिमा तावरे यांनी केले आहे. आता कोरोना संसर्गाची तपासणी केल्यानंंतर रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याला तेथून थेट रुग्णालयात नेले जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या घरच्या किंवा आसपासच्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तर, या रुग्णांवर 14 दिवस रुग्णांवर योग्य इलाज झाल्यास कोरोना संसर्ग आटोक्यात येईल, असेही यावेळी सांगितले आहे.

बारामती एमआयडीसीमध्ये कंपन्या सुरु राहणार
बारामती शहर आणि तालुक्यामध्ये ‘जनता कर्फ्यु’ जाहिर केला आहे. या दरम्यान शहर आणि तालुक्याच्या सर्व सीमा सील केल्या जाणार आहेत. मात्र,एमआयडीसीतील कंपन्या, उद्योग नियम आणि अटींनुसार सुरु राहतील. या कंपन्यांमधील कामगारांना त्यांचे ओळखपत्र दाखवून सोडण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रसारमाध्यमांना दिलीय.