Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळे खासगी शिकवणी वर्गाची 1500 कोटींची उलाढाल ‘ठप्प’

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे राज्यातील खासगी शिकवणी वर्गाची दीड हजार कोटींची उलाढाल टाळेबंदीमुळे ठप्प आहे. जेईई, सीईटी, नीट अशा विविध प्रवेश परीक्षा, शासकीय पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षा, दहावी-बारावीसाठीचे मार्गदर्शन देणार्‍या शैक्षणिक कामकाज कधी पूर्वपदावर येणार याची स्पष्टता नसल्याने खासगी शिकवणी वर्गाचे अर्थकारण अडचणीत आले आहे.

राज्यातील सुमारे दोन ते तीन लाख विद्यार्थी जेईई, सीईटी, नीट या प्रवेश परीक्षा देतात. सुमारे 30 लाख विद्यार्थी दहावी आणि बारावीची परीक्षा देतात. त्याशिवाय सनदी लेखापाल, कंपनी सचिव असे अभ्यासक्रम करणारेही हजारो विद्यार्थी असतात. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाने टाळेबंदी लागू केल्यामुळे शाळा महाविद्यालयांसह खासगी शिकवणी वर्गही बंद आहेत. त्यामुळे खासगी शिकवणी वर्गाच्या माध्यमातून होणारी आर्थिक उलाढाल थांबली आहे.‘राज्यात सुमारे चाळीस ते पन्नास हजार लहान-मोठे शिकवणी वर्ग आहेत. होऊ घातलेल्या नीट, सीईटी, जेईई परीक्षांचे कामकाज बर्‍यापैकी पूर्ण झाले आहे.

मात्र, पुढील शैक्षणिक वर्षांसाठीचे प्रवेश टाळेबंदीमुळे होऊ शकलेले नाहीत. तसेच आता पुन्हा शाळा-महाविद्यालये कधी सुरू होतील याचा काहीच अंदाज नाही. त्यामुळे जेईई, सीईटी, नीटसह दहावी-बारावीसाठीच्या खासगी शिकवणी वर्गाच्या एकूण आर्थिक उलाढालीचा विचार करता सुमारे सातशे ते आठशे कोटींचे नुकसान झाले आहे. बर्‍याच छोटया शिकवणी वर्गाची आर्थिक बाजू कमकूवत असल्याने भाडे भरण्यापासून, उदरनिर्वाहही अडचणीत आला आहे,’ असे खासगी शिकवणी वर्गाची संघटना ‘प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने सांगितले आहे.