स्वतंत्र भारतातील पहिल्या मतदाराने केले मतदान ; शारीरिक व्याधींनी त्रस्त असतानाही दाखवला उत्साह

हिमाचलप्रदेश : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्यासासाठी आज मतदान होत आहे. या मतदानात एका १०३ वर्षीय आजोबांनी लक्ष वेधून घेतले आहे. हिमाचल प्रदेश राज्यात देशातील पहिला मतदार म्हणून नोंद करण्यात आलेल्या शाम शरण नेगी यांनी मतदान केले आहे.

हिमाचल प्रदेशमधील किन्नोर येथे राहणारे नेगी यांच्या हालचालींवर वार्धक्य आणि प्रकृतीच्या तक्रारींमुळे बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. डोळ्यांनी कमी दिसत असले तरी आणि गुडघेदुखी असून सुध्दा त्यांनी मतदान केंद्रावर जात मतदान केले. देशात आतापर्यंत झालेल्या सर्वच्यासर्व म्हणजे १७ लोकसभा निवडणुकीत नेगी यांनी मतदानांचा हक्क बजावला आहे. वयाची शंभरीपार केलेले नेगी गेली  ६८ वर्षे मतदानाचा हक्क बजावत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्यातील मतदान पार पडत आहे. हिमाचलप्रदेशमध्ये देखील अंतिम टप्यात मतदान होत आहे. अंतिम टप्प्यासाठी देशभरातील लोकसभेच्या 59 जागांसाठी मतदान होत आहे.

हिमाचलप्रदेशमधील किन्नोर येथे पहिले मतदान २५ ऑक्टोबर १९५१ रोजी झाले होते. तेव्हा नेगी यांची देशातील पहिला मतदार म्हणून नोंद करण्यात आली होती. देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदा निवडणुका व्हायच्या होत्या, तेव्हा हिमाचल प्रदेशात हिवाळ्यात होणारी बर्फवृष्टी लक्षात घेऊन तिथे निवडणुका आधी घेण्यात आल्या. इतर राज्यांत १९५२ च्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात निवडणुका झाल्या.