बारामुल्लात दहशतवादी हल्ला, 2 CRPF जवानासह SPO शहीद !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस बलातील (सीआरपीएफ) दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील स्पेशल पोलीस ऑफिसर (एसपीओ) शहीद झाले आहेत. आज सकाळी बारामुल्ला जिल्ह्यात सोमवारी ही घटना घडली.

सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी झालेल्या गोळीबारात काही सुरक्षा रक्षकांना गंभीर इजा झाली आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामुल्लातील क्रिरी भागात ही घटना घडली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून जम्मू कश्मिरमध्ये अतिरेकी कारवाया वाढल्या असल्याचे चकमकीवरुन दिसून आले आहे. त्यामध्ये भारतीय जवानांसह काही अतिरेक्यांना ठार करण्यात यश आले आहे. मात्र, सीमेलगत सातत्याने होणार्‍या कुरघोड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.