सौदी अरेबियात दोन भारतीयांचा शिरच्छेद

रियाध : वृत्तसंस्था – सहकाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी दोन भारतीयांना अरेबिया प्रशसनाने शिरच्छेदाची शिक्षा दिली. सतविंदर कुमार आणि हरजित सिंग अशी त्यांची नावे असून ते पंजाबमधील आहेत. मात्र याबाबत अरेबिया प्रशसनाने भारत सरकारला काहीही कळवलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील होशियारपूरच्या सतविंदर कुमार आणि लुधियानाच्या हरजित सिंग यांना आपल्याच भारतीय सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी सौदी अरेबिया प्रशसनाने शिरच्छेदाची शिक्षा दिली. हरजित, सतविंदर आणि इमामुद्दीन या तिघांनी येथील महामार्गावर लूटमार केली होती. त्यानंतर पैशांच्या वाटणीवरून झालेल्या भांडणात इमामुद्दीनची हत्या झाली होती. त्यांच्यावर खटला चालवून २८ फेब्रुवारीला त्यांचा शिरच्छेद केला गेला.

सत्विंदरची काहीच खबरबात न मिळाल्याने त्याची पत्नी सीमारानी हिने परराष्ट्र मंत्रालयात अर्ज दाखल केला. यानंतर भारतीय दुतावासाने सौदी प्रशासनाशी संपर्क साधून मृत्यूदंडाची माहिती मिळवली. दोघांचेही मृतदेह मिळवण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला. पण सौदी कायदा याची परवानगी देत नसल्यामुळे सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने मृतदेह भारतात पाठवण्यास नकार दिला.