लडाखमध्ये लष्कराचे 2 जवान अपघाताचे ‘शिकार’, श्योक नदीत बुडून मृत्यू, मालेगावच्या वीरपुत्राचा समावेश

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लडाखमध्ये लष्कराच्या दोन सैनिकांनी आपला जीव गमावला आहे. लडाखच्या श्योक नदीत बुडण्यामुळे हा अपघात झाला. या दोन जवानांमध्ये नायक सचिन मोरे आणि लान्स नायक सलीम खान यांचा समावेश आहे. एका पुलावर बांधकाम सुरू होते. या दरम्यान, श्योक नदीत बुडल्याने दोन्ही सैनिकांचा मृत्यू झाला. नायक सचिन विक्रम हा महाराष्ट्रातील मालेगावचा, तर सलीम खान पंजाबमधील पटियालाचा होता. काही दिवसांपूर्वीच पूर्व लडाखमध्ये चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक संघर्षात 20 सैनिक शहीद झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. भारताने चीनला आक्रमकपणे उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य यांच्यात झालेल्या संघर्षानंतर सीमेवर तणावाची परिस्थिती कायम आहे. भारत आता लडाखमध्ये संपर्क यंत्रणा बळकट करण्यात गुंतला आहे. त्याअंतर्गत लडाखची गावे आधुनिक संप्रेषण प्रणालीशी जोडली जातील. लडाखमध्ये गलवान खोरे आणि चुशुल यासारख्या भागात हे फोन टर्मिनल बसविण्यात येतील.

चीनला योग्य ते प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने वास्तविक नियंत्रण रेषेवर हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहे. पूर्व लडाखमध्ये चिनी सैनिक आणि हेलिकॉप्टरची हालचाल थांबविण्यासाठी सैन्य आणि हवाई दलाने हवाई संरक्षण क्षेपणास्त्र तैनात केले आहेत. भारत-चीन सीमेवर चिनी सैन्याच्या हालचालींना लक्षात घेता आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीसह इतर क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत.