बांगलादेशात बोट दुर्घटनेत 23 जणांचा बुडून मृत्यू

ढाका : पोलीसनामा ऑनलाइन –  बांगलादेशमधील बुरीगंगा नदीमध्ये सोमवारी एक बोट उलटली. या घटनेत 23 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही बोट एका अन्य जहाजाला धडकली, त्यानंतर ही दुर्घटना घडली. बीडीन्यूज 24 ने फायर सर्व्हिस कंट्रोल रूम अधिकारी रोजिना इस्लाम यांच्या संदर्भाने सांगितले की, ही दुर्घटना ढाकाच्या श्यामबाजारजवळ सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास घडली.

रोजिना इस्लाम यांच्यानुसार मृतांमध्ये तीन मुले आणि सहा महिलांचा समावेश आहे. फायर सर्व्हिसच्या पाणबुड्यांनी घटनास्थळी पोहचून बांगलादेश इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (बीआयडब्ल्यूटीए) आणि तटरक्षक दलाच्या मदतीने बचावकार्य सुरू केले आहे.

बीआयडब्ल्यूटीएचे ट्रान्सपोर्ट इन्स्पेक्टर एमडी सेलिम यांनी सांगितले की, बोट मॉर्निग बर्ड मुंशीगंजहून सदरघाटकडे निघाली असताना ती चांदपुरहून येत असलेल्या मोयूरी -2 जहाजाला धडकली. या बोटीतून 50 पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. बोट बुडाल्यानंतर काहीजण पोहत किनार्‍यावर आले.