प्रवासी वाहनांच्या विक्रीत 26 % वाढ तर दुचाकीच्या विक्रीत 11 % सुधारणा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सणोत्सवपर्वाच्या तोंडावर देशातील वाहन निर्मात्यांना सुखावणारा क्षण म्हणजे सरलेल्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत प्रवासी वाहनांची विक्री ही 26.45 टक्क्यांनी वाढली आहे. सप्टेंबरमध्ये घाऊक पातळीवर 2 लाख 72 हजार 027 प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात 2 लाख 15 हजार 124 वाहनांची विक्री झाली होती. या उद्योग क्षेत्राची संघटना ‘सियाम’ने विक्रीची ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, दुचाकी वाहनांची एकूण विक्री 11.64 टक्क्यांनी वाढली आहे. 18 लाख 49 हजार 546 दुचाकी या महिन्यात विकल्या गेल्या आहेत. तर गेल्या वर्षी हा आकडा 16 लाख 56 हजार 658 इतका होता. यात मोटारसायकलींच्या विक्रीतील वाढ 17.3 टक्के राहिली. मोटारसायकल विक्रीचा आकडा गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमधील 10 लाख 43 हजार 621 वरुन 12 लाख 24 हजार 117 वर गेला. स्कूटरची विक्री 5 लाख 55 हजार 754 वरुन 5 लाख 56 हजार 205 वर गेली आहे.

सियामने म्हटले आहे की, तीन चाकी वाहनांच्या विक्रीत तब्बल 74.63 टक्के घसरण झाली. गेल्या वर्षाच्या सप्टेंबरमध्ये 1 लाख 80 हजार 899 तीन चाकी वाहने विकली गेली होती. हा आकडा यंदाच्या सप्टेंबरमध्ये 45 हजार 902 एवढा आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत सर्व श्रेणीतील वाहनांची विक्री काहिंसी घसरून 55 लाख 96 हजार 223 वर आली. मागच्या वर्षात 56 लाख 51 हजार 459 वाहने विकली गेली होती.

सियामचे अध्यक्ष केनिची आयुकावा यांनी सांगितले की, दुसऱ्या तिमाहीत काही श्रेणीत सुधारणेचे संकेत मिळत आहेत. प्रवासी वाहने आणि दुचाकी वाहनांत सकारात्मक कल दिसून आला. या दोन्ही श्रेणीत गेल्या वर्षी विक्री कमी राहिली होती. यंदा वाढ दिसण्याचे तेही एक कारण आहे. व्यावसायिक वाहने आणि तीन चाकी वाहनांच्या क्षेत्रात विक्री पाच-सहा वर्षापूर्वी सारखी राहिली. आगामी सणासुदीच्या काळात विक्री वाढेल, अशी उद्योगास आशा आहे.

व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत घट

सियामने म्हटले की, जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत प्रवासी वाहनांची विक्री 17.02 टक्क्यांनी वाढून 6 लाख 20 हजार 620 वरुन 7 लाख 26 हजार 232 वर गेली. सप्टेंबर तिमाहीत दुचाकीची विक्री 46 लाख 82 हजार 571 वरुन 46 लाख 90 हजार 565 वर गेली. या तिमाहीत व्यावसायिक वाहनांची विक्री मात्र 20.13 टक्क्यांनी घसरली. या तिमाहित 1 लाख 33 हजार 524 वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी ती 1 लाख 67 हजार 173 इतकी होती.