खंडणी दिली नाही म्हणून दहशत करणारे अटकेत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – दोन हजार रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून मारहाण करुन, दहशत माजवणाऱ्या तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना दिघी रस्त्यावरील सागर प्रोव्हिजन स्टोअर भोसरी येथे रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. मुन्ना उर्फ राजेश रविशंकर तिवारी (२२, मोरेवस्ती, चिखली), अमित चंद्रकांत सोनवणे (२४, दिघी रोड, भोसरी), विजय मनबहादूर थापा (२३, रा. लांडेवाडी, भोसरी) या तिघांना अटक केली आहे. तर अल्पेश मुरकर आणि त्याच्या इतर तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी लक्ष्मण वाघोजी दळवी (७५, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दळवी यांचे दिघी रस्त्यावर सागर प्रोव्हिजन स्टोअर आहे. रविवारी रात्री ते दुकानात असताना मुन्ना आणि त्याचे साथीदार दुकानात घुसले. दळवी यांच्याकडे दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. त्यास नकार दिल्याने त्यांना दुकानातून बाहेर काढले आणि मारहाण करुन जखमी केले. यावेळी हे सोडविण्यासाठी आलेले सचिन फुगे यांनाही मारहाण करून परिसरात दहशत माजवली. याबाबतची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, देवेंद्र चव्हाण (गुन्हे) आणि त्यांच्या पथकाने तिघांना तत्काळ अटक केली. यातील मुन्ना हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर १० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.