पिस्तूल आणि काडतुसांसह तिघे गजाआड

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर अग्नी शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान धुळे पोलिसांनी पिस्तूल बाळगणाऱ्यासह त्याला पिस्तूल विक्री करणाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

किशोर शांताराम मोरे (वय २२ रा. राजीव गांधी नगर, साक्री रोड), मोसिन खान असलम खान (वय २२ रा. मिल्लतनगर), मयुर उर्फ बबुवा सुरेश कंडारे (वय २५ रा. आहिल्यादेवी नगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अग्नी शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व शोध पथकाच्या कर्मचा-यांना आदेश दिलेले होते. त्यावेळी शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांना माहिती मिळाली की, किशोर मोरे नावाचा इसम हा अवैध अग्नीशस्त्र बाळगून ते दाखवून त्याने एक दोन लोकांना दमदाटी केली आहे. किशोर शांताराम मोरे याचा शोध घेवून त्याला ताब्यात घेतले.

त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने त्याच्याजवळ गावठी पिस्तूल असल्याची कबुली दिली. परंतु तो गावठी पिस्तूल तापी नदीत व मिलींद सोसायटीमधील स्मशानभूमीच्या बाजुच्या परीसरात फेकून दिल्याचे सांगून दिशाभुल करीत होता. परंतु त्याने दिलेल्या माहितीवर विश्वास न ठेवता त्याच्याकडे पुन्हा चौकशी केल्यावर त्याने पिस्तूल राहत्या घरात गोदरेज कपाट खाली लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता कपाटाच्या खालून गावठी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आले. त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखळ करण्यता आला आहे. त्यानंतर त्याने पिस्तूल कोणाकडून आणि कोणाच्या मध्यस्थीने घेतले याबाबत चौकशी केली. तेव्हा त्याने सदरचे पिस्तूल मोसिन खान असलम खान याच्या मध्यस्तीने मयुर उर्फ बबुवा सुरेश कंडारे याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर मोसिनखान असलम खान व मयुर उर्फ बबुवा सुरेश कंडारे अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधिक्षक विश्वासराव पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजु भुजबळ, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी ,शहर पोलीस ठाण्याचे शोध पथकाचे कर्मचारी सहायक पोलीस उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, कर्मचारी योगेश चव्हाण, सतिश कोठावदे, कबीर शेख, मुक्तार मन्सुरी, प्रल्हाद वाघ, पकंज खैरमोडे, राहुल पवेल, कमलेश सुर्यवंशी, तुषार मोरे, अविनाश कराड यांनी केली.