37 वर्षांचा ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू निवृत्तीनंतर लिहिणार ‘आत्मचरित्र’, त्याला अजून 5 वर्षे खेळायचंय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘मला भारतीय क्रिकेट संघातून अजून 5 वर्षे खेळायचं आहे. मी निवृत्ती जाहीर केल्यानंतर आत्मचरित्र लिहिणार आहे. त्यामध्ये मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल अनेक विषयांवर स्पष्ट लिखाण करेन. सध्या मी तंदुरुस्त आहे आणि भारतीय संघातून खेळता यावं यासाठी कसून सराव करत आहे,’ असं मत भारतीय क्रिकेट संघातील माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत याने व्यक्त केले आहे. विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा विजेत्या संघामध्ये श्रीसंतचा समावेश होता.

2005 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या श्रीसंतने भारताकडून 27 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 10 टी-20 क्रिकेट सामने खेळले आहेत. वेगवान गोलंदाज म्हणून त्याचा खूप मोठा नावलौकिक होता पण 2013 मध्ये इंडियन प्रीमिअरल लीगमधील (IPL) स्पॉटफिक्सिंग प्रकरणात त्याचे नाव गोवले गेले आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्याच्या क्रिकेट खेळण्यावर आजन्म बंदी घातली होती. त्याविरुद्ध श्रीसंतने कायदेशीर लढा दिल्यानंतर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरील बंदी 7 वर्षांची केली. त्सप्टेंबरच्या शेवटी ही बंदी संपत असल्याने ऑक्टोबर 2020मध्ये श्रीसंत पुन्हा क्रिकेट खेळू शकणार आहे.