गॅस टँकर व लक्झरी बसच्या धडकेत लागलेल्या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू

धुळे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  गॅस टँकर आणि लक्झरी बसच्या भीषण धडकेत दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या दुर्घटनेत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. हा भीषण अपघात सोमवारी (दि.18) दुपारी साडे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान सुरत नागपूर महामार्गावर झाला. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही वाहनांनी पेट घेतला. अपघातग्रस्त गॅस टँकर धुळ्याहून जळगावकडे जात होता तर लक्झरी बस ही जळगावहून धुळ्याकडे येत होती. भिरडाणे फाट्या जवळ या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या घटनेत दोन्ही वाहने जळून खाक झाली असून आता फक्त त्याचे सांगाडे शिल्लक राहिले आहेत.

आगीची माहिती मनपा अग्निशमक दलाला देण्यात आली. अपघात झाला त्यावेळी मोठा आवाज झाला. यामुळे गावतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु आगीचे रौद्र रुप पाहून नागरीक हतबल झाले. मनपा अग्निशमक दलाच्या गाडीने घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचा प्रयत्न केला. फायरमन अधिकारी तूषार ढाके, तुषार पाटील, श्याम कानडे, पांडुरंग पाटील, नरेंद्र बागुल यांनी आगीवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. परंतू या आगीत लक्झरीतील चार जण व टॅकरचा चालक यांचा होरपळून मृत्यू झाला.

महामार्गावर दोन्ही बाजूला चार ते पाच किलोमीटर अंतरावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तीन क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. आगीत महामार्गावरून वीज वाहक तार आगीच्या लोळामुळे तुटल्याने तीस गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज वाहक तार जोडण्याचे काम वीज वितरण कंपनीचे कर्मचारी युध्द पातळीवर करत होते. अंधार झाल्याने कामात अडथळा निर्माण होत होता. वाहतूक सुरळीत करण्यात महामार्ग पोलीसांची चांगलीच दमछाक झाली.

अपघात माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिकारी डॉ. राजू भुजबळ,उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातामुळे मुकटी कर ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहे. महामार्गावरील ढाब्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन्ही वाहनांचे नंबर शोधण्याचे काम पोलीस करत आहे. तालुका पोलीस ठाण्यात अपघाताबाबत रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला.