मोबाईल चोरांकडून ६७ स्मार्ट फोन जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – मोबाईलवर बोलणाऱ्या नागरिकांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या तसेच उघड्या दरवाजातून चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांसह एका अल्पवयीन मुलाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे ६७ स्मार्ट फोन जप्त करण्यात आले आहेत.

अमिन सज्जाद इनामदार (वय-२५ रा. आदर्शनगर, मोशी), शेखर संभाजी जाधव (वय-१९ रा. दिघी रोड, भोसरी, मुळ रा. मुपो मोगा, ता. उदगीर, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरांची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस शिपाई गणेश सावंत यांना दोन सराईत गुन्हेगार मोबाईल फोनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. युनिट १ च्या पथकाने अमिन इनामदार याला नाशिक फाटा परिसरातून तर शेखर जाधव याला भोसरी ओव्हर ब्रीज परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पथकाने अमिन इनामदार याच्याकडून १३ तर शेखर याच्याकडून ४१ मोबाईल जप्त केले. या कारवाईत पथकाने भोसरी आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी भगतवस्ती भोसरी येथील एका अल्पवयीन मुलाकडे देखील मोबाईल असल्याची माहिती मिळाली. पथकाने अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन १३ मोबाईल जप्त केले.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस कर्मचारी रविंद्र राठोड, राजेंद्र शेटे, दिपक खरात, प्रमोद लांडे, प्रमोद वेताळ, अमित गायकवाड, महेंद्र तातळे, सावन राठोड, सचिन उगले, प्रविण पाटील, प्रमोद हिरळकर, सुनिल चौधरी, विशाल भोईल, गणेश मालुसरे, तानाजी पारसरे, अरुण गर्जे, सचिन मोरे, गणेश सावंत यांच्या पथकाने केली.