CAA विरोधात दिल्लीत हिंसाचार : पोलिसासह 7 जण ठार, सर्व शाळा बंद आणि परीक्षाही रद्द, काही मेट्रो स्टेशन ‘बंद’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे दिल्लीत आले असताना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सोमवारी दिल्लीत मोठा हिंसाचार उसळला आहे. ईशान्य दिल्लीतील अनेक भागात हिंसाचार झाला असून आंदोलकांनी केलेल्या गोळीबारात एक पोलीस हेडकाँस्टेबल ठार झाला आहे. सीएए समर्थक आणि विरोधक समोरासमोर भिडले असून त्यात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यु झाला आहे. तर ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

सोमवारी पहाटे सुरु झालेल्या या हिंसाचारात दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. अनेक गाड्यांना आगी लावण्याबरोबरच दुकानांची तोडफोड करण्यात आली. रात्री उशिरा गोकुळपुरी टायर मार्केट येथे आग लावण्यात आली होती. सीएए विरोधक आणि समर्थक यांच्यातील हिंसाचारात अनेकांच्या हातात पिस्तुले आढळून आली आहेत. त्यातील एकाने केलेल्या गोळीबारात पोलीस हेडकाँस्टेबलला गोळी लावून त्यात त्यांचा मृत्यु झाला.

दिल्लीतील हा हिंसाचार लक्षात घेऊन दिल्ली शासनाने मंगळवारी सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बोर्डाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच ज्या भागात हिंसाचार झाला. तेथील मेट्रोची काही स्टेशने आज बंद ठेवण्यात आली आहेत.

मुंबईत आंदोलनाचा प्रयत्न
दिल्ली हिंसाचाराच्या विरोधात मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात रात्री काही जणांनी आंदोलनाचा प्रयत्न केला. मरीन ड्राईव्हवरुन हे सर्व आंदोलक गेट वे ऑफ इंडियाकडे जात होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी वाटेत अडविले. पोलिसांनी आंदोलन करु पाहणाºया सुमारे ३० जणांना ताब्यात घेतले.