…म्हणून आईनंच केला 9 महिन्याच्या मुलाचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – बार्शी तालुक्यात भरदिवसा पाळण्यात झोपलेल्या नऊ महिन्याच्या मुलाचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जन्मदात्या आईला अटक केली असून तिने गुन्हा केल्याचे कबूल केल असल्याची माहिती बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनी दिली. या घटनेमुळे बार्शी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

बार्शी तालुक्यातील वांगरवाडी गावात ही घटना घडली असून, अश्विनी तुपे ( वय २३ ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. २२ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास दोन व्यक्तींनी घरात प्रवेश केला. त्यानंतर मी किचनमध्ये काम करत असताना चिमुकल्याचा रडण्याचा आवाज आल्याने बाहेर आले. तेव्हा एका हाफ पॅन्ट आणि बनेल घातलेली व्यक्ती माझ्या बाळाचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळत होता. म्हणून अश्विनीने आपल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी क्षमायाचना केली. पण तरी सुद्धा हल्लेखोरांनी बाळाचा गळा आवळून बाळ जमिनीवर टाकले आणि मला मारहाण करुन माझे हातपाय बांधून घरातील कपाट उचकटले. त्यात काहीच न सापडल्याने माझ्या गळ्यातील २ ग्रॅम सोन्याचे गंठण चोरांनी नेल्याची माहिती अश्विनीने पोलिसांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, बार्शी ग्रामीण पोलिसांनी तीन दिवसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून, ही हत्या चक्क जन्मदात्या आईनेच केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. अश्विनी तुपे यांना दोन मुले होती. त्यातील मोठा मुलगा आणि मृत छोटा मुलगा यांच्या वयात खूप कमी अंतर होते. म्हणून दोन्ही मुलांना संभाळण्याचा कंटाळा आल्याने अश्विनी यांनी आपल्या ९ महिन्याच्या सार्थक याची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. पोलिसांनी अश्विनी तुपे हिला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.