एक स्वप्न ज्याने बदलले आयुष्य; आईला घेऊन देश फिरायला गेला मुलगा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सध्या तरुण उद्योजक सरथ कृष्णन आपल्या आईला फिरायला घेऊन गेल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सरथ आपल्या आईसमवेत देशाच्या बर्‍याच ठिकाणी फिरला असून, यापूर्वी त्याने असे करण्याचे कारणही दिले होते. सरथ कृष्णन म्हणाला की, एके दिवशी त्याने पाहिले की, तो वाराणसीच्या घाटांवर (काशी) आपल्या आईचा हात धरून चालत आहे व मागे भजनाचा आवाज येत आहे, परंतु डोळे उघडताच त्याला समजले की, तो त्याच्या खोलीत आहे व त्याने हे सर्व स्वप्नात पाहिले आहे.

तो म्हणाला की, मला ते अशक्य वाटत होते तरीही त्याने एक निर्णय घेतला आणि लॅपटॉपमध्ये दोन हवाई तिकीट बुक केले. किचनमध्ये जाऊन त्याने आईला सांगितले, “अम्मा, मी तिकीट बुक केले आहे; आता चल जाऊयात!”

वाराणसीला जाण्याच्या मुलाच्या निर्णयाने त्याची आई गीता रामचंद्रन यांना धक्का बसला. त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा मुलगा ठाम राहिला. त्यानंतर काही तासांनंतर ते कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन दिवस प्रवास असल्याने कपड्यांची बॅग घेऊन गेले. सरथ आठवण काढून सांगतो की, ”आम्ही फ्लाइटमध्ये चढलो आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाराणसीला पोहोचलो. त्या दिवशी आम्ही स्वप्नात होते तसे हात धरून घाटांवर गेलो.”

30 वर्षांचा सरथ म्हणतो की, अम्माबरोबरचा कोणताही प्रवास स्वर्गासारखा आनंद देतो. आई गीता यांनाही हे खूप आवडते. आई-मुलगा दोघेही मिळून दर तीन महिन्यांनी एकदा सहलीला जातात. त्यांचा पहिला प्रवास मुंबई येथून सुरू झाला तेथून ते नाशिक, शिर्डी आणि अजिंठा-एलोरा या लेण्यांकडे गेले. या प्रवासात 11 दिवस गेले, ”60 वर्षांच्या गीता म्हणतात की, त्या आता आपल्या मुलासह दिल्ली, अमृतसर, वाघा सीमा, तिबेट, नेपाळ आणि माउंट एव्हरेस्टला गेल्या आहेत!

उद्योजक सरथने आपल्या कामाचा भाग म्हणून आणि दर्शनासाठी दोन्ही रूपाने बर्‍याच सहली केल्या आहेत. तो म्हणाला की, “एक सुंदर दृश्य आणि नवीन अनुभवांचा आनंद मला अम्माबरोबर शेअर करायचा आहे आणि मी तिला विचारले की, ती माझ्याबरोबर येणार का?” अम्मा आध्यात्मिक व्यक्ती म्हणून आमच्या घराबाहेर कधीच पडली नाही, त्यामुळे मी तिला नेले आणि आम्ही प्रवास सुरू केला की ती खूप आनंदी झाली.

गीता म्हणाल्या की, ‘मी 60 वर्षांची आहे, मधुमेहामुळे, या वयात जग पाहण्याची आशा नव्हती. पण आता मी खूप आनंदी आहे आणि पुढच्या सहलीची योजना करत आहे. माझी प्रार्थना आहे की, आता माझे आयुष्य माझे नशीब आणखी काही वर्षे वाढवावे जेणेकरून मी उर्वरित ठिकाणीदेखील जाऊ शकेन.’