21000 रुपयाची लाच घेताना मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) –   वाळूचे टिपर चालू ठेवण्यासाठी आणि त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी 21 हजार रुपयांची लाचेची मागणी करून 10 हजार रुपये लाच घेतली. उर्वरीत 11 हजार रुपयांची लाच घेण्याच्या प्रयत्नात असताना मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कापशी बु. येथील मंडळ अधिकारी नन्हु गणपतराव कानगुले (वय- 46 रा. वात्सल्यनगर सोसयटी, नवीन नांदेड सिडको) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांनी 28 जून 2020 रोजी नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात मंडळ अधिकारी कानगुले याच्याविरुद्ध तक्रार दिली. तक्रादार यांच्या मेहुण्यांच्या मालकीचे तीन टिपर आहेत. या टिपरमधून वाळू वाहतूक होत असून हे टिपर चालू ठेवण्यासाठी आणि कोणतीही कार्यवाही न करण्यासाठी दरमहा 10 हजार प्रमाणे तीन वाहनांचे 30 हजार रुपयांची मागणी कानगुले यांने केली होती. तडजोडीमध्ये 21 हजार रुपये देण्याचे ठरले होते. 21 हजार रुपया पैकी 10 हजार रुपये यापूर्वीच देण्यात आले होते.

उर्वरीत 11 हजार रुपयांची मागणी कानगुले याने केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 30 जून रोजी पंचासक्ष पडताळणी केली असता कानगुले याने उर्वरीत 11 हजार रुपये घेण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत अधिकाऱ्यांनी नन्हु कानगुले याला लाचेची मागणी करून लाच घेतल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबिंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कपिल शेळके, पोलीस नाईक एकनाथ गंगातीर्थे, जगनाथ अनंतवार, विलास राठोड, ताहेर खान, शेख मुजीब यांच्या पथकाने केली.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.