165000 रुपयाची लाच घेताना महावितरणचा अभियंता आणि सहायक अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – महावितरण कंपनीची 95 इलेक्ट्रीक विजमिटर देण्यासाठी आणि विद्युत पुरवठ्याचे ट्रान्सफार्मर बसवून देण्यासाठी महावितरण कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि सहायक अभियंत्याला 165000 हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज भारतनगर येथील कार्य़ालयात करण्यात आली. या कारवाईमुळे महावितरण कंपनीच्या कार्यालयात खळबळ उडाली आहे.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता कृष्णराव अरविंद श्रृंगारे आणि सहायक अभियंता मंगेश प्रभाकर खरगे असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांच्या चालू असलेल्या कामावर 95 इलेक्ट्रीक विजमिटर देण्यासाठी आणि विद्यु पुरवठा करणारे 315 केव्हीअे चे ट्रान्सफार्मर बसवून विद्युत पुरवठा देण्यासाठी सादर करण्यात आलेल्या अहवालाला मंजुरीसाठी पाठवण्यासाठी श्रृंगारे आणि खरगे यांनी 165000 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. यामध्ये दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

आज नाशिक येथील भारतमाता नगरमधील इंदिरानगर कक्षामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यावेळी कृष्णाराव श्रृंगारे याने 1 लाख 20 हजार आणि मंगेश खरगे याने 45 हजार रुपयाची पंचासमक्ष मागणी करुन लाच स्विकारण्याचा प्रयत्न केला असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.