काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता अडचणीत, होणार 400 कोटींच्या ‘हवाला’ प्रकरणाची ‘चौकशी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांना आयकर विभागाकडून समन्स जारी करण्यात आले आहे. पटेल यांना 400 कोटी रुपयांच्या हवाला ट्रान्सजॅक्शन प्रकरणात नोटीस जारी करण्यात आली असून त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयकर विभागाकडून काँग्रेस पार्टीला विविध कंपन्यांनी पाठवलेल्या 400 कोटी रुपयांहून अधिक हवाला ट्रान्सजॅक्शनचा तपास केला जात आहे.

आयकर विभागाने यापूर्वी अहमद पटेल यांना 11 फेब्रुवारी रोजी समन्स जारी केले होते आणि त्यांना 14 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. हे समन्स IT Act सेक्शन 31 अंतर्गत जारी करण्यात आले आहे. मात्र, अहमद पटेल हे 14 फेब्रुवारीला प्रकृती खराब असल्याच्या कारणावरून हजर राहून बाजू मांडू शकले नव्हते. त्यांनी श्वसनाचा त्रास होत असल्याने फरीदाबादच्या मेट्रो रुग्णालयात दाखल झालो होते असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे एका घोटाळ्यात नाव आले होते. आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणात चिदंबरम यांना ईडीने अटक केली होती. या प्रकरणात चिदंबरम यांना काही दिवस तिहार तुरुंगात रहावे लागले होते. 2007 मध्ये पी. चीदंबरम अर्थमंत्री असताना बेकायदेशीर परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली, असा आरोप चिदंबरम यांच्यावर होता. 2017 मध्ये सीबीआयने FIPB मध्ये झालेल्या अनियमतेबद्दल तक्रार दाखल केली होती. त्यावेळी चिदंबरम यांचे पहिल्यांदा नाव आले होते.