नेवासा ‘ऑनर किलिंग’ : आरोपी घरीच असताना अटक नाही, आता पसार झाल्यानंतर पोलिसांकडून शोध

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नेवासा तालुक्यातील कौठा येथील ‘ऑनर किलिंग’ मधील आरोपी असलेले मयत मुलीचे आई-वडील पोलिसांना सापडेनात. सुरुवातीला आरोपी घरीच असतानाही पोलिसांनी अटक केले नाही. आता आरोपी पसार झाल्यानंतर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

कौठा येथील मुलीने संगमनेर येथील युवकासोबत आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तिच्या आई-वडिलांनी पोटच्या मुलीचा खून करून घाईगडबडीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन-चार दिवस आरोपी घरीच होते. मात्र त्यावेळी पोलिसांनी अटक केली. मात्र, गुन्ह्यात सहभाग असल्याने घाबरलेले आरोपी आई-वडील पसार झाले. आरोपी पसार झाल्यानंतर सोनई पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

खून केल्यानंकर कोणालाही न सांगता सकाळी लवकर अंत्यविधी उरकून टाकला. आरोपींनी पुरावा नष्ट केला होता. प्रथमदर्शनी आई-वडिलांनीच खून केल्याचे उघड असतानाही पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. त्यामुळे आरोपींना पळून जाण्याची संधी मिळाली. विवाहित मुलीच्या लग्नानंतर तिच्या पतीलाही न सांगता तिचा अंत्यविधी उरकणे, विशेष म्हणजे कौटुंबिक तीव्र विरोध असतानाही मुलीचा मृत्यू होतो व तरीही पोलीस कुठल्याही प्रकारचा पुरावा नव्हता म्हणून अटक केली नाही, असे आता सांगत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घेतलेली ही वेळकाढूपणाची भूमिका आरोपींसाठी फायद्याचे ठरली व आरोपींना पळून जाण्यास संधी मिळाली.

‘ऑनर किलिंग’ सारखी गंभीर घटना घडलेली असताना पोलिसांनी वेळकाढूपणाची भूमिका का घेतली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता आरोपी ब्रह्मदेव मरकड व अाशा मरकड ते फरार असून सोनई पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. काही वर्षांपूर्वी याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनई येथे ‘ऑनर किलिंग’ची घटना घडली होती. यातील काही आरोपींना नाशिक येथील विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.