शिवसेनेला मोठा धक्का ! ‘या’ ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपानं केली हातमिळवणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात भाजपाला शह देत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. नंतर तीनही पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढली. पण आता अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत वेगळेच चित्र पहावयास मिळत आहे. महापालिकेच्या स्थायी सभापतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले होते.

टाळेबंदी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेली अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीची सभापती निवडणूक आज पार पडली. २१ व २४ सप्टेंबरमध्ये उमदेवराना अर्ज वितरण करुन दाखल केले. नंतर सकाळी ११ च्या सुमारास निवडणूक विशेष सभा झाली. त्यानंतर अर्जाची छाननी होण्याच्यापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपात सामना रंगला. भाजप नगसेवक मनोज कोतकर राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यामुळे नगर महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ जास्त असताना सुद्धा भाजप राष्ट्रवादीची सत्ता आली.

जानेवारी २०१९ मध्ये पहिली स्थायी समिती अस्तित्वात आली. एका वर्षाच्या कालावधीनंतर चिठ्या काढून ८ सदस्य ३१ जानेवारी २०२० रोजी निवृत्त झाले. त्यात सेनेचे व राष्ट्र्वादीचे प्रत्येकी तीन तसेच काँग्रेस व भाजपचा प्रत्येकी एक नगरसेवक होता. त्यांच्या या रिक्त ठिकाणी अशाच पक्षीय सदस्य संख्यानुसार नवे सदस्य नियुक्त होणार होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात प्रभाग ६ या जागेच्या पोटनिवडणुकीत सेना उमेदवाराचा पराभव करत भाजपच्या पल्लवी जाधव विजयी झाल्याने मनपातील पक्षीय बलाबल बदले. त्यामध्ये सेनेची एक जागा कमी झाली.

भाजपची संख्या वाढून १५ वर गेली तर सेनेकडे २४ पैकी २३ जागा राहिल्या. त्यामुळे स्थायी समितीत सेनेचे संख्याबळ एक जागेने कमी होत ५ वर आले. तर भाजपची १ ने वाढ होऊन ४ वर गेले. यामुळे आता ८ जागांत राष्ट्रवादीचे ३, सेना व भाजपचे प्रत्येकी २ व काँग्रेसचा एक सदस्य नियुक्त होण्याची चिन्ह आहेत. परंतु भाजपने राष्ट्रवादीला मदत केल्याने हे गणित बिघडण्याची शक्यता आहे.