Air India नं एका रात्रीत 50 पायलटांना नोकरीवरून काढलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  एअर इंडियाच्या वैमानिकांनी ५० वैमानिकांच्या सेवा “बेकायदेशीरपणे संपुष्टात आणण्याच्या” मुद्द्याबाबत व्यवस्थापनाला हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. इंडियन कमर्शियल पायलट्स असोसिएशनने (आयसीपीए) शुक्रवारी एअर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव बंसल यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, सुमारे ५० वैमानिकांना कंपनीच्या सेवा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कर्मचारी विभागाकडून बेकायदेशीर समाप्तीची पत्रे मिळाली आहेत. आयसीपीएने एका ट्विटमध्ये म्हटले, “काय होत आहे? योग्य प्रक्रियेचे पालन न करता रात्रीत आमच्या सुमारे ५० वैमानिकांची सेवा संपुष्टात आणली गेली. या महामारीच्या काळात देशाची सेवा करणाऱ्यांसाठी हा एक धक्काच आहे.”

हे देखील कळले आहे की, दक्षिणेत पाच वर्षे पूर्ण केलेल्या अनेक बेस क्रू कॉन्ट्रॅक्टचे नूतनीकरण केले जात नाही. दक्षिणेकडील भागात १८ केबिन क्रूच्या सेवा देखील संपुष्टात आल्या आहेत. आयपीसीएने एअर इंडियाच्या सीएमडीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या वर्षी राजीनामा देऊन आणि सहा महिन्यांच्या नोटीस मुदतीत राजीनामा मागे घेतलेल्या वैमानिकांना गुरुवारी रात्री १० वाजता अचानक सेवामुक्त करण्यात आले. वैमानिकांचा आरोप आहे की, क्रूला त्यांच्या राजीनाम्याचा स्वीकार आणि त्यानंतरच्या नोटीस मुदत इत्यादीबद्दल माहिती देण्यात आली नव्हती.

त्यात म्हटले गेले आहे की, “१३ ऑगस्ट रोजी कार्यालय बंद झाल्यानंतर या वैमानिकांच्या सेवाही संपुष्टात आल्या होत्या, त्यानंतरही १४ ऑगस्टला एआय ८०४/५०६ चालवण्यासाठी वैमानिकांना ड्यूटीवर ठेवण्यात आले. स्पष्ट आहे ही विमाने उड्डाण करणारे वैमानिक १३ ऑगस्टनंतर तांत्रिकदृष्ट्या एअर इंडियाचे कर्मचारी नव्हते.” यात पुढे म्हटले आहे की, “हे उड्डाणांच्या सुरक्षेचे विनोदी आणि अत्यंत गंभीर उल्लंघन आहे.

विचार करणारी गोष्ट म्हणजे हे विमान उड्डाण करणाऱ्या वैमानिकांची मनःस्थिती काय असेल? ज्यांची सेवाच संपुष्ट केली गेली आहे.” आयसीपीएने आठवण करून दिली की, नागरी उड्डाण मंत्रालय आणि एअर इंडियाने आश्वासन दिले होते की, इतर विमान कंपन्यांप्रमाणे एअर इंडिया त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला काढून टाकणार नाही.