IndiGo च्या कर्मचार्‍यांना मोठा दिलासा ! कंपनीनं घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोनामुळे अनेक कंपन्यांकडून कर्मचार्‍यांच्या पगारात कपात करण्याचा धुपा निर्णय घेतला आहे. मात्र, खासगी क्षेत्रातील विमान कंपनी इंडिगोने कर्मचार्‍यांना दिलासा दिला आहे. कर्मचार्‍यांच्या वेतन कपातीचा निर्णय मागे घेतल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांनी गुरूवारी कर्मचार्‍यांना दिली. सरकारनं यापूर्वी कंपन्यांना आपल्या कर्मचार्‍यांचं वेतन कपात न करण्याच्या सुचना दिल्या होत्या. याच धर्तीवर कंपनीने निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे देशात गेल्या महिनाभरापासून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तसंच 3 मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. यादरम्यान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांच्या महसूलावर मोठा परिणाम झाला आहे. यानंतर इंडिगोने कर्मचार्‍यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता तो मागे घेण्यात आला आहे. सरकारच्या सुचनेचा आदर करत कंपनीने वेतन कपात रद्द केल्याचे दत्ता यांनी पाठवलेल्या ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. लॉकडाउनकडे पाहता आपल्या कंपनीतील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या वेतनात कंपनी कपात करणार सल्याची घोषणा रोनोजॉय दत्ता यांनी यापूर्वी केली होती. कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि त्यांच्या वरील सर्व अधिकारी 20 टक्के, उपाध्यक्ष आणि चालक दलातील सदस्य 15 टक्के कमी वेतन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.