ट्रेननंतर आता ‘फ्लाईट’बाबत सरकारनं बदलले नियम, तिकिट बुकिंगपूर्वी नक्की वाचा

नवी दिल्ली : 200 नॉन-एसी ट्रेन चालवण्याच्या निर्णयाच्या एक दिवसानंतर सरकार 25 मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करत आहे. विमानतळांनी सरकारच्या सहकार्याने कोरोना व्हायरस पासून सुरक्षेची खात्री करण्यासाठी विस्तृत योजना तयार केली आहे. देशातील एक तृतीयांशपेक्षा अधिक प्रकरणे असलेल्या महाराष्ट्र राज्याने विमानतळांवर प्रवाशांच्या तपासणीसाठी असमर्थता दर्शवली होती. ज्यानंतर नवी व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवाशांना तिकिट बार कोड दिला जाईल

एका अधिकार्‍याने सांगितले की, विमानतळांवर लागू होणारा नवा प्रोटोकॉल किमान संपर्क आणि सोशल डिस्टन्सिंगवर आधारित असेल. विमानतळांवर संपर्कहिन तपासणी होईल. प्रवाशांना एक तिकिट बारकोड दिला जाईल, जो त्यांना विमानतळावर प्रवेश देण्यासाठी उपयोगी येईल. यासोबतच चेक-इन सामानावर कोणताही बॅग टॅग वापरला जाणार नाही. अधिकार्‍याने सांगितले की, विमानच एकमात्र अशी जागा असेल जेथे सोशल डिस्टन्सिंग पाळता येणार नाही.

अधिकार्‍यांनी मधल्या सीट रिकाम्या ठेवण्याबाबत सांगितले की, बसण्याच्या क्षमतेमध्ये 3 टक्के कमतरतेमुळे तिकिटाचे दर खुप वाढतील. तसेच कम्प्यूटर बेस्ड बॅगेज टॅगसाठी चर्चा सुरू आहे, जर ही चर्चा यशस्वी झाली नाही तर प्रवाशांना बॅगवर ओळखीचा टॅग लावणे आवश्यक होऊ शकते. विमानतळावर सर्व स्थानांवर-गेटच्या बाहेरपासून कॅफेटेरियापर्यंत सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक असणार आहे.

अधिकार्‍यांनी सांगितले की, विमानतळांवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी मार्किंग करण्यात आली आहे. यापैकी अशी अनेक विमानतळे आहेत जेथे अगोदरपासूनच परदेशातून भारतीयांना परत आणले जात आहे. विमानतळाची जबाबदारी असणार्‍या जीएमआर कंपनीने विमानतळे उघडण्यासाठी सर्व तयारी सुरू केली आहे. याअंतर्गत विमानतळावर गाड्यांच्या पार्किंगसाठी सुद्धा सोशल डिस्टन्सिंगकडे लक्ष दिले जाणार आहे. सोबतच सामान वाहण्याच्या ट्रॉलीचीही खास व्यवस्था केली जाणार आहे.