अजित पवारांनी ‘या’ मुद्यावरून टोचले शिवसेनेचे ‘कान’, भाजपाकडून बाके वाजवून ‘दाद’ !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – बुधवारी विधानसभा कामकाजाच्या नियमावर बोट ठेवत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेचे कान टोचले. यामागील कारण म्हणजे शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई यांनी त्यांच्या जागेऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शेजारच्या आसनावरून कामकाज मांडले. तेव्हा ही बाब अजित पवारांना खटकली आणि त्यांनी सांगितले की सदस्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जागेवरूनच बोलले पाहिजे.

सभागृहात कामकाजाच्या दरम्यान सुरुवातीला समित्या आणि महामंडळाचे अहवाल ठेवण्यात आले. या वेळी शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई कागदपत्रे सभागृहाच्या समोर मांडत असताना सुभाष देसाई त्यांच्या जागेवर न बसता गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जागेवर बसले. त्यांच्या या जागा बदलण्यावरून सभागृहात गोंधळ माजला कारण अजित पवारांना ही गोष्ट खटकली आणि त्यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या या विरोधाला भाजपाने देखील दाद दिली आणि भाजप सदस्यही अजित पवारांच्या सुराला सूर मिळवू लागले. तथापि, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गदारोळ थांबवला आणि सांगितले की सर्वच सदस्यांनी हा नियम पाळला पाहिजे.

सुभाष देसाई यांचा अहवाल मांडून अजित पवार बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी विधानसभा कामकाजाच्या नियमाकडे लक्ष वेधले. पवार म्हणाले की, कुणी मंत्री असो की विरोधी पक्ष नेता असो, ज्याने त्याने आपल्याला नेमुन दिलेल्या जागेवर बसूनच बोलले पाहिजे. कुणीही नियमांचे उल्लंघन न करता नियमांना धरून वागले पाहिजे. त्यांनी असे बोलताच भाजपाच्या सदस्यांनी बाके वाजवून अजित पवार यांच्या सूचनेचे स्वागत केले आणि या सूचनेला पाठिंबा दिला.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/