नायडु हॉस्पिटलमध्ये मद्यपी ‘कोरोना’बाधिताचा ‘राडा’, पळून जाणार्‍यास पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणताना मोठी ‘कसरत’

पुणे : नायडु हॉस्पिटलमध्ये एका मद्यपी कोरोना बाधितांने बराच वेळ राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केल्यावर तो गेटवर चढून बाहेर रस्त्यावर आला होता. शेवटी कसेबसे करुन त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणल्यावर डॉक्टर, कर्मचारी आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

अल्कोहोल विड्रॉलच्या नैराश्येतून त्याने हा प्रकार केला. याच रुग्णाने हॉस्पिटलमधील खिडकीच्या काचा फोडून तिथल्या डॉक्टरांवरही हल्ला केला होता. हॉस्पिटलमधी चौथ्या मजल्यावर असलेला हा मद्यपी रुग्ण थेट मुख्य गेटजवळ आल्याने कर्मचार्‍यांची धावपळ उडाली. पण तो कोरोना बाधित असल्याने कोणीही पुढे होऊन त्याला अडविण्याचा प्रयत्न केला नाही. केवळ तोंडाने त्याला पुन्हा आत जा म्हणून सांगत होते. तो मला घरी जायचे असे सांगत होता. तो चालत दरवाजाजवळ आल्यावर तेथील पोलिसांनी तातडीने दरवाजा लावून घेतला. तेव्हा तो गेटवर चढला व तेथून तो खाली उतरुन रस्त्यावर आला. त्याच्या मागोमाग पोलीस व कर्मचारी जाऊ लागले. त्याला अनेकांनी ओरडून पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले. कसे तरी करुन त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्यानंतर पीपीई किट घातलेल्या कर्मचार्‍याला बोलावून त्याला पुन्हा त्याच्या रुममध्ये नेण्यात आले. त्यानंतर सर्व डॉक्टर, कर्मचारी आणि पोलिसांच्या जीवात जीव आला.