‘मरकज’मध्ये सहभागी झालेला प्राध्यापक तडकाफडकी ‘निलंबित’

प्रयागराज :  वृत्तसंस्था –  तबलीगी जमातशी संबंधित आलाहाबाद युनिव्हर्सिटीचा प्राध्यापक मोहम्मद शाहिद याला निलंबित करण्यात आले आहे. मकरझमध्ये सहभागी झाल्याची माहिती लपवण्यासाठी आणि परदेशी नागरिकांना शरण दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मोहम्मद शाहिद हे देखील दिल्ली निझामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर ते उत्तर प्रदेशात परतले होते. शाहिद याच्यावर प्रयागराजच्या शिवकुटी पोलिसांनी महामारी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच इतरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
यापूर्वी प्राध्यापक शाहिद याच्यासहीत 30 मरकझ प्रकरणाशी निगडीत लोकांना तात्पुरते कारागृहात हलवण्यात आले आहे. यामध्ये 16 परदेशी नागरिकांचाही समावेश असून या सर्वांना सोमवारी रात्री पोलिसांनी अटक केली होती. मागील महिन्यात पार पडलेल्या मरकझमध्ये प्राध्यापक शाहिद सहभागी झाले होते. तेथून परतल्यानंतर ते अनेक दिवस युनिव्हर्सिटीत जात होते. एवढेच नाही तर त्यानी दोन दिवसांत 350 मुलांची परीक्षा देखील घेतली.

तसेच शाहीद अनेक शिक्षक, कर्मचारी आणि इतरांच्या संपर्कात आले. सरकारकडून अनेकदा आवाहन करून देखील त्यांनी मकरझची माहिती लपवून ठेवली होती. तसेच इंडोनेशियाहून आलेल्या 8 परदेशी नागरिकांसहीत नऊ तबलीगी जमात संबंधितांना त्यांनी प्रयागराजच्या अब्दुल्ला मशिदीत लापून राहण्यासाठी मदतही केली होती.