शिवसेनेवर भाजपची कुरघोडी, अंबरनाथमध्ये 5 रूपयांमध्ये जेवण देऊ असं म्हंटलं

अंबरनाथ : वृत्त संस्था – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जाहीरनाम्यात राज्यभरात १० रुपयाता पोटभर जेवण देण्याची घोषणा केली आहे. त्यावर भाजपाने कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत ५ रुपयांमध्ये जेवण देऊ असे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या या घोषणेवर टिकाही झाली. एक रुपयात झुणका भाकर योजनेचे काय झाले असा प्रश्नही विचारला जाऊ लागला. शरद पवार यांनी राज्य चालविणार की स्वंयपाकी होणार अशी त्यावर टिका केली.

असे असले तरी अंबरनाथमध्ये गेल्या ६ महिन्यांपासून १० रुपयांत तेही पोटभर जेवण मिळत आहे. या संकल्पनेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथचे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या संकल्पनेतून ही योजना अंबरनाथमध्ये १ मे रोजी सुरु करण्यात आली. शिवसेनेने या योजनेतूनच प्रेरणा घेऊन ही घोषणा केली की आणखी काही हे जाहीर केले नसले तरी अंबरनाथमधील ही योजना रोल मॉडेल ठरु शकते.

या योजनेत १० रुपयांत वरण, भात, भाजी, पोळी आणि एक गोड पदार्थ असे जेवण दिले जाते. तेही अनलिमिटेड. हे जेवण प्रत्यक्षात २० रुपयांना पडते. त्यात रोजचा एकूण खर्च धान्यासोबतच गॅस, जेवण तयार करणारे स्वयंपाकी, जेवण वाढणारे लोक, भांडी घासणाऱ्या महिला यांचे पगारही धरला जातो. खर्चाच्या वरील रक्कम दानशुर व्यक्ती, देणगीदारांच्या मदतीने भागविला जात आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदेच या मागे असल्याने आतापर्यंत तरी त्याला कोणतीही आर्थिक चणचण भासली नाही. अंबरनाथमधील गोरगरीब, मजूर, कामगारवर्ग याचा लाभ घेत आहेत.

१९९५ मध्ये युती सरकारने अशाच प्रकारे १ रुपयात झुणका भाकर योजना सुरु केली होती. त्यावेळी सरकारने स्टॉलला जागा तसेच अनुदान दिले होते. मात्र, बहुसंख्य शिवसैनिकांनी यासाठी स्टॉल घेतले. त्यावर उत्साहात सुरुवातीला झुणका भाकर देण्यात येत होते. पण, ते परवडणे अशक्य होऊ लागले तसे एक दोन तास झुणका भाकर १ रुपयात विकली जाऊ लागली. त्यानंतर तेथे वडापाव, इडली, डोसा असे पदार्थ विकले जाऊ लागले.

त्यानंतर कालांतराने झुणका भाकर योजनेतून स्टॉल घेतलेल्यांनी अंग काढून घेतले. तरी ते स्टॉल मात्र, आजही त्यांच्याच नावावर असून त्यावर इतर खाद्य पदार्थ विकले जात आहे. आता बहुतांश हे स्टॉल परप्रांतीय चालवत आहेत. नियोजनाअभावी एका चांगल्या योजनेची वाट लावली गेली. आंध्र प्रदेश, तामिळनाडुत अशा योजना मोठ्या नियोजनबद्धरित्या यशस्वीपणे चालविल्या जातात.

Visit : Policenama.com