‘इस्लामोफोबिया’च्या मुद्यावरून PAK तोंडघशी पडलं, संयुक्त राष्टसंघात UAE आणि मालदीवनं दिलं भारताला समर्थन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  संयुक्त राष्ट्रात भारताविरूद्ध खोटे सांगण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानला पुन्हा अपयश आले आहे. पाकिस्तानने इस्लामिक सहयोग संघटनेच्या (ओआयसी) बैठकीत भारतात इस्लामोफोबियाच्या मुद्द्यावर अनौपचारिक गटाची स्थापना करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण मालदीव आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांनी त्यांचा प्रस्ताव पूर्णपणे नाकारला.

पाकिस्तानने इस्लामोफोबियाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला

संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी मुनीर अकरम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ओआयसी राजदूतांच्या बैठकीत भारतात कथित इस्लामोफोबियाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाकडून मुस्लिम आणि काश्मिरींवर अत्याचार होत आहेत. खानही म्हणाले की, कोरोना काळात भारतात मुस्लिमांविरूद्ध द्वेष आणखी वाढला आहे. मोदी सरकारने नियम बदलून जम्मू-काश्मीरमध्ये गैर-काश्मिरींना कायमस्वरुपी नागरिक होण्याचा अधिकार दिला आहे हेही सांगण्याचा प्रयत्न केला. पण मालदीव आणि युएईने पाकिस्तानचे हे पाऊल निकामी ठरवले.

मालदीवने फेटाळून लावले आरोप

मालदीवच्या माध्यमांनुसार, त्यांच्या देशाचे राजदूत थिलमीजा हुसेन यांनी भारताला निशाणा करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फेटाळत म्हटले की, इस्लामोफोबियाबाबत भारतावर आरोप करणे केवळ चुकीचेच ठरणार नाही, तर दक्षिण आशियातील धार्मिक सुसंवादासाठी देखील धोकादायक असेल. अमेरिकेत मालदीवचे राजदूत हुसेन यांनी असेही म्हटले की, काही लोकांचे विधान आणि सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे, याला भारताच्या १३० कोटी लोकांच्या भावना समजून घेऊ नये.

पाकिस्तानला उत्तर

मालदीवच्या युक्तिवादाचे समर्थन करत या बैठकीची अध्यक्षता करणाऱ्या युएईच्या राजदूतांनी देखील इस्लामोफोबियाबाबत औपचारिक गट तयार करण्याच्या पाकिस्तानच्या आरोपाला फेटाळले. ते म्हणाले की, ओआयसीच्या परराष्ट्र मंत्र्यांना अशा प्रकारचे गट तयार करण्याचा अधिकार आहे. मालदीव आणि युएईने पाकिस्तानला याबाबत चांगलेच उत्तर दिले आहे. युएई पाकिस्तानला देणगी देणाऱ्या देशांमधील सर्वात मोठा देश आहे, तर मालदीवने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच त्यांना पाठिंबा दिला आहे.