शाळा सुरू करा अन्यथा…ट्रम्प यांनी दिला इशारा

पोलिसनामा ऑनलाईन – अमेरिकेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, कॉलेज अनेक सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहेत. असे असतानाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जर शाळा सुरू केल्या नाही तर शाळांना देण्यात येणारा निधी रोखण्यात येईल, असा इशारा ट्रम्प त्यांनी दिला आहे.

सार्वजनिक आरोग्य अधिकार्‍यांनी आखून दिलेली मार्गदर्शक सूचना अधिक कठोर असल्याची तक्रारही डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यांच्या या तक्रारीनंतर काही वेळातच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी एक मोठी घोषणा केली. कोरोनाच्या नियंत्रणासाठी आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील आठवड्यात नवी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार असल्याचेही माईक पेंस यांनी सांगितले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांमी स्थानिक प्रशासन आणि अधिकार्‍यांवरही दबाव वाढवला आहे. परंतु अशा परिस्थितीतही न्यूयॉर्क शहर प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेत आठवड्यात केवळ दोन किंवा तीनच दिवस शाळेत जातील आणि बाकीच्या कालावधीत ऑनलाइन शिक्षण घेतील, असे सांगितले आहे . अमेरिकेत सध्या 31 लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर न्यूयॉर्कसारख्या शहरातच 4 लाख बाधित असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.