शहा आणि ठाकरेंमध्ये लोकसभेच्या वेळी विधानसभेचं ठरलेलं अद्यापही गुलदस्त्याच ! चंद्रकांत पाटलांनी सांगितला ‘तो’ प्रस्ताव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महायुतीचीच सत्ता येणार असल्याचं 24 ऑक्टोबरला विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. दरम्यान, त्यापुर्वीच शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद करून लोकसभेच्या वेळी ठरलेल्या फॉर्म्युल्याबाबत सांगितलं. त्यानंतर मात्र भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तासंघर्ष पहावयास मिळत आहे. आज मुंबईत सत्ता स्थापनेसाठी आणि मुख्यमंत्री पदाबाबत ठरविण्यासाठी आयोजित करण्यात आलेली भाजप-शिवसेनेची बैठक रद्द झाली आहे. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लोकसभेच्या वेळी नेमकं काय ठरलं होतं ते प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.

लोकसभेच्या वेळी विधानसभा निवडणुकीनंतर अडीच-अडीच वर्ष भाजप-शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा प्रस्ताव आला होता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज मला सांगितलं आहे. त्यापुढं मुख्यमंत्र्यांनी आपल्याला अमित शहा आणि उध्दव ठाकरे यांच्यामध्ये नेमकं काय ठरलं हे माहिती नसल्याचं सांगितलं असल्याची माहिती चंदक्रांत पाटलांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. जे काही ठरलं आहे ते अमित शहा आणि उध्दव ठाकरे यांच्यामध्ये ठरलं आहे. त्यामुळे ते दोघे एकमेकांशी बोलतील आणि लवकरच चित्र स्पष्ट होईल असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दुसरीकडे मात्र शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द फिरवल्याचं सांगत आज आयोजित केलेली पहिली सत्ता स्थापनेबाबतची बैठक रद्द केल्याचं सांगितलं. पुढे बोलताना संजय राऊत यांनी उद्याचं निश्चित नसल्याचं देखील म्हंटलं होतं. त्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि उध्दव ठाकरे यांच्यात कधी चर्चा होईल आणि सत्ता स्थापनेबाबत कधी चित्र स्पष्ट होईल हे अद्यापही गुलदस्त्याच आहे.

Visit : Policenama.com