…आणि न्यायाधिशांनी उदयनराजेंना केले निर्दोष मुक्त

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – खासदार उदयनराजे भोसले यांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ते काही काळासाठी आरोपीच्या पिंजऱ्यात बसले होते. मात्र, त्यांची सुटका झाली आहे. शेती व पिण्याच्या पाण्यापासून ते थेट काश्मीर प्रश्नापर्यंत तसेच सातारा जिल्ह्याचा विकास, अच्छे दिनची घोषणा आदिंवर खासदार उदयनराजें भोसलेंनी वकिलांच्या प्रश्नावर बिनधास्त उत्तरे दिली. त्यामुळे सर्व आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. शिवाय प्रश्न विचारणाऱ्या भावी वकिलांनी उदयनराजेंना आणखी पाच वर्षे दिल्लीत खासदार म्हणून प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘जनता अदालत’ या कार्यक्रमात शुभेच्छाही दिल्या.

साताऱ्यातील ईस्माईल लाॅ काॅलेजमधील विद्यार्थ्यांनी ‘जनता अदालत’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. उदयनराजेंनी यात सहभाग नोंदवला. यावेळी या कार्यक्रमात व्यासपीठावर अभिमत न्यायालयाप्रमाणे रचना करण्यात आली होती. व्यासपीठासमोर एका बाजूच्या लाकडी पिंजऱ्यात पक्षकार उदयनराजे यांना बसवण्यात आले होते. सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याचा सर्वांगिण विकास, वैयक्तिक आवडी निवडी, आदर्श व्यक्तिमत्व अशा विविध प्रश्नांवर मनमोकळी उत्तरे दिली.

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर आपली थेट बाजू मांडताना उदयनराजे म्हणाले की, “कच्चा माल उपलब्धता, विकसीत पायाभूत सुविधा यांमुळे उद्योगांचा कल आधिपासूनच मुंबई, पुणे, ठाणे या महानगरांकडे होता. परंतु, आता तेथील वाढीवर मर्यादा असल्याने हे उद्योग धंदे महामार्गालगतच्या शहरांकडे सरकू लागले आहेत. कास तलाव उंची वाढ, ग्रेड सेपरेटर आदी कामांमुळे साताऱ्यातही विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. निसर्ग व ऐतिहासिक पर्यटनासाठी जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. त्यासाठीचे काही प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. आचारसंहिता संपल्यावर त्याला गती मिळेल.” असे ते म्हणाले.

यावेळी उदयनराजे यांना प्रश्न विचारण्यात आला की, जीवनात कोणाला आदर्श मानता ? यावर उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, “सर्व गुणांचा संचय असलेले एकच व्यक्तिमत्व या जगात आहे, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! शिवाजी महाराज हेच माझे आदर्श आहेत.”