दुर्दैवी : US मध्ये धबधब्यावर सेल्फी काढण्यासाठी गेली होती कमला, भारतीय इंजिनीअर तरुणीचा मृत्यू

विजयवाडा : पोलीसनामा ऑनलाइन –  अमेरिकेमधील बाल्ड नदीजवळील धबधब्यावर सेल्फी काढताना पाय घसरून पडल्याने आंध्र प्रदेशातील 26 वर्षीय इंजिनीअर तरुणीचा मृत्यू झालाय.

पोलावरापू कमला असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, ही दुर्दैवी घटना 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी बाल्ड नदीजवळील एका धबधब्यावर घडलीय. कमला ही मूळची आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्यातील गुडावेलुरू गावातील रहिवासी आहे.

कमलाच्या कुटुंबीयांनी याबाबत सांगितले की, कमला आणि तिचा पती अटलांटातील नातेवाईकांना भेटून घरी परतत होती. यावेळी ते बाल्ड नदीजवळील धबधब्यावर थांबले. या ठिकाणी सेल्फी काढताना दोघांचा पाय घसरून ते नदीत कोसळले. यावेळी कमलाच्या पतीला वाचवण्यात यश आले. मात्र, कमलाचा शोध लागू शकला नाही. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली. 40 मिनिटांनंतर ती बेशुद्धावस्थेमध्ये आढळली. कमलाला बाहेर काढल्यानंतर तात्काळ रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. तिला वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातातून बचावलेल्या कमलाच्या पतीने सांगितले की, आम्ही दोघे धबधब्याच्या वरच्या टोकावर उभे होतो. सेल्फी काढताना आमचा पाय घसरल्याने आम्ही खाली पाण्यात पडलो.

कमलाच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसलाय. कमलाने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं होतं. तसेच ती पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. तिथे तिला नोकरीही लागली होती. या तरुणीचा मृतदेह भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नॉर्थ अमेरिकन तेलुगू असोसिएशनने तिचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले आहे, असे कमलाच्या वडिलांनी सांगितले आहे.