‘कयार’ नंतर अरबी समुद्रात आणखी एक ‘चक्री’वादळ

दक्षिण भारतासह लक्ष्यद्वीप बेटांवर अतिवृष्टीची शक्यता, राज्यात पाऊस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कयार हे महाचक्रीवादळ आता भारतापासून दूर गेले असतानाच अरबी
समुद्रात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचे गुरुवारी चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यामुळ लक्ष्यद्वीप बेटे, मालदीव येथे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील तीन दिवस दक्षिण भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सुदैवाने हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकत आहे. मात्र, त्याचा परिणाम पश्चिम किनारपट्टीला बसणार आहे. त्यामुळे लक्ष्यद्वीप बेटे, केरळ, तामिळनाडु, कर्नाटक किनारपट्टी परिसरात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अरबी समुद्रावर कयार अतितीव्र चक्रीवादळ आता भारतापासून दूर गेले आहे. त्याचवेळी अरबी समुद्रात मालदीव परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले
आहे. बुधवारी दुपारी ते केरळमधील तिरुअनंतरपुरम पासून २७० किमी दूर होते. गेल्या ६ तासात ते ताशी १३ किमी वेगाने पुढे सरकत आहे. येत्या १२ तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. यामुळे लक्ष्यद्वीप बेटांवर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील ४८ तासात केरळातील तुरळक
ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. ३१ ऑक्टोबरला कर्नाटक किनारपट्टीवरील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील दोन दिवस कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच १ नोव्हेंबरला औरंगाबाद, बीड, लातूर, पुणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. २
नोव्हेंबरला नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.