‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाच्या लेखकाची माफी, पुस्तक घेतले मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याबरोबर केल्याने महाराष्ट्रातील लोकक्षोम लक्षात घेऊन अखेर आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांनी माफी मागितली आहे. हे पुस्तकही मागे घेत असल्याचे भाजपाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केले आहे.

या प्रकाराबाबत प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, देशभरात कालपासून लोकांमध्ये या पुस्तकामुळै नाराजी व्यक्त होत होती. छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊच शकत नाही. जयभगवान गोयल यांनी जे पुस्तक लिहिले आहे. त्याचा भाजपाशी काही संबंध नाही. पुस्तक प्रकाशित होईपर्यंत यात काय आहे, याची कल्पना नव्हती. आज त्यांनी भेटून माफी मागितली आहे. हे पुस्तक मागे घेण्यात आले आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊ शकत नाही. कल्याणकारी राज्य त्यांनी चालवले. त्यामुळेच इतक्या वर्षांनंतर त्यांचे स्मरण आजही लोक करतात. या पुस्तकामुळे अनेक ठिकाणी आंदोलने झाली. हे पुस्तक ज्यांनी लिहिले आहे, ते लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागितली आहे. हे पुस्तक मागे घेण्यात आले आहे़.हा मुद्दा इथे संपवावा, अशी विनंती प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.