महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह 11 जणांच्या नियुक्त्या रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ व 10 सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्यात आल्या आहेत. महिला व बाल विकास विभागाच्यावतीने त्याबाबतचे आदेश मंगळवारी (दि.16) जारी करण्यात आले आहेत. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची महामंडळाच्या उपाध्यक्षपदावर निवड केली होती. मात्र, निवडणुकीनंतर राज्यात भाजपसोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेने दोन्ही काँग्रेससोबत महाविकास आघाडी करून सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडीकडून भाजपने विविध महामंडळावर केलेल्या नियुक्ती रद्द करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने महामंडळातील नियम 85 (1) व नियम 66 (1) च्या तरतूदीला अधीन राहून उपाध्यक्ष चित्रा वाघ व अन्य 10 सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.

रद्द करण्यात आलेल्या नियुक्त्या
दर्शना महाडिक (रत्नागिरी), शलाका साळवी, रितू तावडे (मुंबई), विना तेलंग (नागपूर), चंद्रकांता सोनकांबळे (पिंपरी), साधना सुरडकर (औरंगाबाद), मीनाक्षी पाटील (लातूर), उमा रामशेट्टी (परळी), अर्चना डेहनकर (नागपूर) आणि शैलजा गर्जे (आष्टी)