प्रियंका यांच्या ‘सिग्नल’नंतरही पायलट यांचं बंडाचं ‘विमान’ हवेतच, राहुल गांधींना 5 महिन्यात 2 धक्के

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आक्रमक झेंडा हाती घेतला असून त्यांचे मन वळवण्यासाठी प्रियंका गांधी यांनी शेवटच्या क्षणी प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. प्रियांका यांनी पायलट यांना समेट करण्याचा निरोप पाठवला असून पायलट यांचे बंड मात्र थांबणार नसल्याचे दिसत आहे. मार्च महिन्यातच ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्ष सोडला होता. अशात आता सचिन पायलट देखील पक्ष सोडण्याच्या तयारीत दिसत आहेत. यामुळे ५ महिन्यातच दोन नेते दूर गेल्याने राहुल गांधी यांच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित झाला आहे.

आता तर थेट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाच त्यांनी आव्हान दिले आहे. सचिन पायलट यांनी हॉटेल ही काही विश्वास मत दाखवण्याची जागा नाही, विधानसभेत गेहलोत यांनी विश्वास मत सिद्ध करावे, असे आवाहन दिले आहे.

सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे हे दोघेही राहुल यांच्या किचन कॅबिनेटमध्ये असल्याचे समजले जात होते. ते समवयस्क असल्याने त्यांच्यात मैत्रीचेही नाते होते. पण पक्षात संधीच मिळत नाही आणि ज्येष्ठ नेत्यांनाच सतत संधी मिळत असल्याने त्यांच्यात डावलल्याची भावना होती. या सर्व गोष्टी राहुल यांना सांगूनही काही होत नसल्याने त्यांनी शेवटी भाजपसह जाण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयामुळे मात्र काँग्रेस समोर मोठं संकट उभे राहिले आहे.