चीनची राजधानी ‘बीजिंग’मध्ये पसरत आहे ‘कोरोना’ ? 5 दिवसात 106 रूग्ण आले समोर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूने आता पुन्हा चीनमध्ये हजेरी लावली आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे, गेल्या 5 दिवसात बीजिंगमध्ये कोरोना विषाणूची 106 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या मते, 10 जून पर्यंत म्हणजेच गेल्या 56 दिवसांपासून बीजिंगमध्ये एकही कोरोना विषाणूची घटना घडली नव्हती, परंतु 11 जूनला 1, 12 जूनला 6, 13 जूनला 36, 14 जूनला देखील 36 आणि 15 जूनला बीजिंगमध्ये 27 नवीन कोरोना विषाणूची प्रकरणे समोर आली आहेत.

केवळ बीजिंगच नाही तर चीनमधील अन्य शहरांमध्येही पुन्हा कोरोना विषाणूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांत संपूर्ण चीनमध्ये कोरोना विषाणूची 164 नवीन प्रकरणे नोंदली गेली. सोमवारी चीनमध्ये कोरोना विषाणूची 40 नवीन प्रकरणे समोर आली.

चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण सुमारे 8 महिन्यांपूर्वी सुरू झाली. नंतर कोरोना विषाणूची लागण रोखण्यास चीनला यश मिळाले. परंतु हा विषाणू चीनमधून संपूर्ण जगभर पसरला आणि सध्या भारतासह संपूर्ण जगाला या विषाणूने आपल्या विळख्यात जखडले. आतापर्यंत जगभरात कोरोना विषाणूची 81 लाखाहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि भारतातही ही संख्या 3.3 लाखांपेक्षा जास्त आहे.

चीनमध्ये कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर तिथे या विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. पूर्वी चीनमधील विषाणूचे मुख्य केंद्र वुहान शहर होते आणि आता त्याचे मुख्य केंद्र राजधानी बीजिंग बनत चालले आहे.