राजगुरूनगरचा सहाय्यक कृषी अधिकारी 9 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे,पोलीसनामा ऑनलाइन – राजगुरूनगर तालुका कृषी कार्यालयातील सहाय्यक कृषी अधिकार्‍यास 9 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. अनुदान मंजूर करण्यासाठी लाच घेतली. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.

विठ्ठल ज्ञानेश्वर राऊत (वय 49, रा. खेड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राजगुरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

यातील 23 वर्षीय तक्रारदार यांनी ठिबक सिंचन-तुषार सिंचनासाठी शासनाकडून अनुदानासाठी 18 फाईल राजगुरूनगर कृषी कार्यालयात दिल्या होत्या. या फाईलच्या प्रकरणाचे अनुदान मंजूर करण्यासाठी लोकसेवक विठ्ठल राऊत याने 9 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारादर यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी राऊत यांना तडजोडीअंती 9 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

विठ्ठल राऊत हे राजगुरूनगर तालुका कृषी कार्यालयात सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून काम करत होते.