२५ हजाराची लाच स्विकारताना सहायक पोलीस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन- गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागून २५ हजार रुपये स्विकारणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.

असिफ वहाब बेग (वय-३८) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय युवकाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

असिफ बेग पालघर जिल्ह्यातील माणिकपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदार यांनी एका महिलेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेने देखील तक्रारदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल न करण्यासाठी बेग याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीमध्ये २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंघक विभागाकडे याची तक्रार केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता बेग याने ५० हजार रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने मंगळवारी पोलीस ठाण्यात सापळा रचून बेग याला २५ हजार रुपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अंकुश बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन मोरे, तानाजी गायकवाड, संदेश शिंदे, महिला पोलीस शिपाई रजपूत, चालक पोलीस शिपाई त्रिभुवन यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Loading...
You might also like