इराणची राजधानी तेहरानमधील वैद्यकीय क्लिनिकमध्ये लागली आग, 19 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इराणची राजधानी तेहरानच्या उत्तर भागात वैद्यकीय क्लिनिकमध्ये झालेल्या स्फोटामध्ये कमीतकमी 19 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. इराणच्या सरकारी वाहिनीने वृत्त दिले आहे की, मंगळवारी रात्री इराणची राजधानी असलेल्या वैद्यकीय क्लिनिकमध्ये आग लागली आणि त्यानंतर स्फोट झाला.

सरकारी वाहिनीने म्हटले आहे की, सीना अतहर आरोग्य केंद्रात झालेल्या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींचे नुकसान झाले. या घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 15 महिलांचा समावेश आहे.

तेहरानमधील आपत्कालीन वैद्यकीय सेवांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आग लागल्यानंतर सकाळी 20:56 वाजता (1626 GMT) सीना अहतर क्लिनिकमध्ये स्फोट झाला. त्यानंतर वैद्यकीय युनिट्स त्वरित रवाना करण्यात आल्या.” तेहरानच्या अग्निशमन विभागाचे प्रवक्ते जलाल मालेकी यांनी सांगितले की, स्फोटानंतर आगीवर नियंत्रण ठेवण्यात आले असून आग विझविण्यात आली. या स्फोटात जवळपासच्या दोन इमारतींचेही नुकसान झाले आहे.

मालेकी म्हणाले की, क्लिनिकच्या तळघरात ठेवलेल्या गॅस कनस्तराला आग लागल्यामुळे ते फुटले. स्फोट होताना बळी पडलेल्यांपैकी काही जण ऑपरेशन रूममध्ये वरच्या मजल्यावरील होते. काही रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात होती तर काही त्यांच्याबरोबर होते.