आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलिसांवर तडीपार गुंडांचा हल्ला

टॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गुन्हेगाराला अटक करून पोलीस ठाण्यात नेणाऱ्या पोलिसांवर तडीपार गुंडांनी हल्ला चढवत त्या गुन्हेगाराला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चित्रपटाच्या कथानकाला शोभणारा हा प्रकार सिल्लोड तालुक्यातील सोनप्पा वाडी शिवारात घडला. त्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

सरदार सांडूसिंग लखवाल हा सिल्लोड तालुक्यातील कुख्यात गुंड व गांजा तस्कर आहे. तो अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होता. तो सोनप्पावाडी येथील घरी असल्याची माहिती पोलिसांनी गोपनीय सुत्रांकडून मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गरदर्शनाखाली बीट जमादार देवीदास जाधव व विठ्ठल डोके यांनी त्याला सापळा रचून पकडले. त्यानंतर त्याला घेऊन दुचाकीवरून पलीस ठाण्याकडे पोलीस निघाले. त्यावेळी त्याचे नातेवाईक योगेश साडूसिंग लखवाल (३४), रामधन साडूसिंग लखवार व संग्रामसिंग सरदार लखवाल या तडीपार गुंडांना याची माहिती मिळाली. त्याला दोनच कर्मचारी घेऊन जात असल्याची माहिती त्यांना मिळाल्यावर सोनप्पावाडी येथे लाठ्या काठ्या व दगडांनी पोलिसांवर हल्ला चढवला. त्यात पोलीस कर्मचारी अचानक हल्ला झाल्याने खाली पडले. आरोपींनी त्यांच्यावर ट्रॅक्टर घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लखवाल इतरांसोबत पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर लखवाल याचा मुलगा संग्रामसिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानतंर ३ जणांच्या शोधात पोलीस गेले आहेत. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली.