अमेरिकेच्या नौदलाच्या पर्ल हार्बर शिपयार्डवर गोळीबार, सर्व गेट बंद

वाशिंग्टन : वृत्त संस्था – अमेरिकेच्या नौदलाच्या पर्ल हार्बर येथील तळावर गोळीबारीची घटना घडली असून एका बंदुकधाऱ्याने हल्ला केला असून तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला गोळीबाराने उत्तर दिले आहे. या घटनेत किमान तिघा जणांचा मृत्यु झालाचे वृत्त आहे.

स्थानिक वेळेनुसार बुधवारी अडीच वाजता (भारतीय वेळेनुसार पहाटे २ वाजता) हा हल्ला झाला आहे. पर्ल हार्बर आणि हिकम येथील नौदलाच्या तळाच्या प्रमुखांनी ट्विट करुन ही घटना घडल्याचे सांगितले आहे. पर्ल हार्बरच्या नौदलाच्या शिपयार्डावर गोळीबार झाला असून त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला सडेतोड उत्तर दिले असल्याचे सांगितले आहे. एकाने या तळावर प्रवेश करुन अचानक आपल्याकडील बंदुकीतून चौफेर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याच्याकडे धाव घेतल्यावर या हल्लेखोराने स्वत:वर गोळीबार करुन घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत अधिक माहिती लवकरच देण्यात येणार असल्याचे पर्ल हार्बर सुरक्षा दलाने सांगितले आहे. या घटनेमुळे दोन्ही शिपयार्डची सर्व गेट बंद करण्यात आली आहेत.

अमेरिकेच्या नौदलाच्या प्रमुख तळापैकी पर्ल हार्बर आणि हिकम ही अतिशय महत्वाचे तळ आहे. होनोलुलु या बेटाजवळ हे अमेरिकेच्या नौदलाचा सर्वात मोठा तळ आहे. या ठिकाणी शेकडो जहाजे थांबू शकतात. नौदलातील जहाजाची व पाणबुड्यांची देखभाल, दुरुस्तीही येथे केली जाते.

जपानच्या शेकडो विमानांनी ८ डिसेंबर १९४१ मध्ये पर्ल हार्बर या तळावर जबरदस्त हल्ला करुन तो जवळपास नष्ट केला होता. या हल्ल्यानंतर दुसऱ्या महायुद्धात अमेरिका उतरला होता. या हल्ल्याचा बदला म्हणून अमेरिकेने जपानवर अणुबॉम्बचा प्रयोग केला होता.