माथाडी संघटनेच्या अध्यक्षाकडून एकावर जीवघेणा हल्ला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षाने कुटुंबियांसोबत घरात घुसून एकावर लोखंडी सत्तूरने डोक्यात वार करून जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत एकजण जखमी झाला असून त्यांच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबलू जोगदंड, त्यांचा साथीदार, आई व बहिण यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत महादेव सुर्वे (३५, वर्षे) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या पत्नी वासंती सुर्वे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास मंगलनगर येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बबलू जोगदंड यांना श्रीकांत यांचं राहतं घर आणि लगतची जागा कमी किमतीत हवी होती. यास श्रीकांतने नकार दिल्याने बबलू कोयता घेऊन आला. सोबत आई, बहीण आणि एक साथीदार लाठी-काठी घेऊन आले होते. तेव्हा श्रीकांत यांच्यावर जोगदंड यांनी वार केले. ते चुकवत श्रीकांत घरात धावले. परंतु बबलू यांनी घरात घुसून डोक्यात आणि पायावर सपासप वार केले. यात श्रीकांत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाकड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. सोमवारी रात्री साडे आठची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून बबलू हा भाजप संलग्न माथाडी कामगार सेनेचा अध्यक्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading...
You might also like